
राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध मद्य विक्रीवर व धाबा मालकांवर कारवाई
बुलडाणा (प्रतिनिधी ) – राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मा. आयुक्त रा. उ. शु. म. रा. मुंबई श्री. सूर्यवंशी साहेब, व विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क अमरावती , विभाग अमरावती, श्री ओहोळ, तसेच श्रीमती भाग्यश्री पं. जाधव अधीक्षक मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक १ /१२/ २०२३ ते दिनांक २९/१२/२०२३ या कालावधीत एकूण १०२ गुन्हे नोंदविण्यात आले असून १०१ वारस गुन्हे, १ बेवारस गुन्हे नोंदवून १०८ आरोपी यांना अटक करण्यात आली, तसेच १६ दुचाकी वाहन व १ ऑटोसह एकूण २८ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर गुन्ह्यांमध्ये देशी मद्य ६१५ लि., विदेशी मद्य ७८लि., ताडी ४२ लि., रसायन (सडवा) २८४८६ लि., हातभट्टी १०४१ लि., बिअर ११.७ लि., मद्य पकडण्यात आले.
तसेच दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा यांचे समवेत राज्य उत्पादन शुल्क विभाग व धामणगाव बढे येथील पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सिंदखेड लपाली येथील गोपाल दगडू मुंडाळे यांच्या राहते घरी सुका गांजा ४.५ किलो व ओला गांजा ५.५ किलो व गुगळ शिवारात शेतात पेरणी केलेले गांजाचे झाडे अंदाजे ३२ किलो गांजा असा एकूण ४२ किलो गांजा पकडण्यात आला . सदर प्रकरणी आरोपी नामे गोपाल दगडू मुंडाळे, एन . डी . पी . एस. ऍक्ट १९८५ चे कलम २० अन्वये अटक करण्यात आलेली असून सदर आरोपीस दिनांक ०४/०१/२०२४ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे .
तसेच श्रीमती नयना देशमुख दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मेहकर व त्यांचा स्टॉफ यांनी दिनांक २७/१२/२०२३ रोजी मेहकर बायपास रोड, मेहकर येथील हॉटेल कैलास ढाब्यावर छापा टाकला असता तेथे दोन ग्राहके हे विनापास परवाना सदर ढाब्यावर मद्य सेवन करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा चे कलम ६८(ए, बी,) व ८४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला .
तसेच श्री. रोकडे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चिखली व श्रीमती नयना देशमुख, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क मेहकर व स. दु. नि. पहाडे , जवान जाधव, प्रदीप देशमुख यांच्यासह दिनांक २७/१२/२०२३ रोजी मलकापुर पांग्रा, तालुका सिंदखेडराजा येथील श्री. प्रवीण मधुकर जाधव यांच्या हॉटेल निसर्ग धाब्यावर छापा टाकला असता तेथे दोन ग्राहक हे विनापास परवाना सदर ढाब्यावर मद्य सेवन करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा चे कलम ६८ (ए, बी,) व ८४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
तसेच सदर प्रकरणी या कार्यालयाने नाताळ व नव वर्षानिमित्त दिनांक २४/१२/२०२३ ते दिनांक ३१/१२/२०२३ या कालावधीत विशेष मोहीम राबवून अवैध ढाबे तसेच अवैध मद्यविक्री करणाऱ्या व्यक्तींविरुध्द कठोर कार्यवाही करण्याचे ठरविलेले आहे. तरी कोणत्याही व्यक्तीने विनापरवाना असलेल्या अवैध धाब्यांवर मद्य सेवन करू नये तसेच कोणीही अवैध मद्यविक्री करू नये याबाबत योग्य ती दक्षता घेण्याबाबत सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत .
बनावट मद्य तसेच गावठी हातभट्टी दारूच्या सेवनामुळे जीवितहानी किंवा गंभीर स्वरूपाचे आजार होण्याची किंवा अन्य दुर्घटना होण्याची दाट संभावना असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या कार्यालयाचा मद्यसेवन परवाना प्राप्त करून केवळ शासनमान्य अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी व सेवन करावे.
तसेच आपल्याला परिसरात अशी अवैध मद्यविक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास या विभागास टोल फ्री नंबर १८००८३३३३३ वर किंवा व्हाट्सअप नंबर ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.In. या विभागाचे पोर्टलवर तत्काळ माहिती कळवावी .
सदर प्रमाणे जर बुलढाणा जिल्ह्यातील किरकोळ व ठोक मद्य अनुज्ञप्तीधारक यांच्या अनुज्ञप्तीमध्ये जर बनावट मद्य आढळून आले तर त्यांची अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल तसेच ज्याप्रमाणे वाहन चालवीताना वाहनाचा परवाना आवश्यक आहे, त्याचप्रमाणे मद्य बाळगताना , मद्य सेवन, मद्य वाहतूक करताना, अथवा मद्य विक्री करताना किंवा आपले जागेचा वापर अवैध ढाबा चालवण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल . असे आवाहन अधीक्षक भाग्यश्री जाधव, राज्य उत्पादन शुल्क विभाग बुलढाणा यांनी केले आहे.